हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

मुलामा


बरबटलेल्या मनामनांना अभिमानाचा बरा मुलामा
घुसमट होता आत सदोदित
मुग्ध असावे कथेत रंगत
राव कृष्ण खाताना पोहे पुरवत जातो रंक सुदामा

मिटून मेंदू तसेच डोळे दृष्टीआड म्हणावी सृष्टी
अपरंपार जपावी भक्ती
भक्तीतच आसक्ती ... सक्ती
अगम्य त्यागावे शोधावी हवे त्यास सोपीशी पुष्टी

जन्मावे कोषात मरावे कोषातच ... वर मिटून डोळे
बहुसंख्येने पिचता पिचता
आक्रसून आवाका घेता
राखावा आवेश अकारण ... मात्र असावे अजाण भोळे

हिंस्त्र श्वापदे आणि संकटे गजबज करता अवतीभवती
स्वतास निष्पापच समजावे
मरतानाही फक्त म्हणावे
सदैव सारे असेच असते ... अशीच असते भयाण नियती!


- निलेश पंडित
११ एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा