हा ब्लॉग शोधा

शनिवार, ९ मे, २०२०

तेज


लख्ख प्रकाशात  |   साचतो अंधार
पोकळी अपार    |   चिरसत्य ||

भासो वा न भासो  |  नित्य जग सारे
चाचपडणारे  |   चाचपडे ||

नाव नाममात्र  |  म्हणावे ज्या बोध
कुणी म्हणे शोध  |  टप्पा एक ||

गतिमान असे  |  जरी हा प्रवास
केवळ आभास  |  प्रगतीचा ||

त्यात वर जग  |  आखते चाकोरी
सामान्या शिदोरी  |  भीरुतेची ||

नैतिकानैतिक  |  म्हणे काहीबाही
बंद दिशा दाही  |  करण्यास ||

काटेकोर रुक्ष  |  स्वप्नासही कक्षा
मुक्त त्यास शिक्षा  |  बंधनाची ||

भेदती मर्यादा  |  मात्र काही शूर
आळविती सूर  |  नाविन्याचे ||

शब्दानि:शब्दाचे  |  रचून डोंगर
असे बंडखोर  |  जगतात ||

रचतात जग  |  स्वतःचेच सुप्त
राहतात गुप्त  |  त्यातच ते ||

आयुष्याचा त्यांच्या  |  गवसता अंश
मानवाचा वंश  |  दिपतसे ||

ऐसे कलंदर  |  केवळ विरळा
बाकी गोतावळा  |  मेंढरांचा ||

दृश्यापलिकडे | आभासी जगात
प्रकाशाच्या आत | वसे तेज ||


- निलेश पंडित
१० मे २०२०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा