हा ब्लॉग शोधा

रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१

सिद्धांत

 

आजही मी एकटा अन् शांत आहे

दाबला मी आतला आकांत आहे


मी स्वतःला तीळभरही दिसत नाही 

चेहरा केवळ जगाचा प्रांत आहे


कळत नाही अन् प्रचीती येत नाही

एवढा सोपा म्हणे वेदांत आहे


धूर सोन्याचा इथे येतो अजुनही

जेवणाची बहुजनांना भ्रांत आहे


साध्य नसते सिद्धही नसतेच काही

सांगतो तो हा गहन सिद्धांत आहे


नेहमी मोठे-जुनेपण मिरवतो तो

चेहरा त्याचा सदोदित क्लांत आहे


राखण्याचे वचन देतो मारतो मग

पूर्वजांपेक्षा जरा उत्क्रांत आहे


सबळ नसते साक्ष अन् नसतो पुरावा

सांगती तेव्हाच 'हा दृष्टांत आहे'



- निलेश पंडित

८ फेब्रुवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा