हा ब्लॉग शोधा

शनिवार, २२ मे, २०२१

सत्यम् अप्रियम्


भारतात कोविडची दुसरी लाट चालू आहे. संसर्ग आणि मृत्यू जगभर थैमान घालत आहेत. भारताचा गेली काही वर्षे वार्षिक मृत्यूदर प्रतिसहस्त्र  ७.३ च्या आसपास होता. म्हणजेच जवळपास सरासरी प्रतिदिन २७००० मृत्यू. सध्या कोविडचा मृत्यूदर प्रतिदिन जास्तीत जास्त ४००० च्या आसपास जाहीर होतोय. सत्तावीस अधिक चार एकतीस हजार ... हा मृत्यूदर उपलब्‍ध स्मशानं, कबरस्तानं, फ्यूनरल होम्ससाठी फार जास्त नाही. स्मशानं म्हणजे दररोज शंभर टक्के क्षमतेवर चालणारे कारखाने नव्हेत. कामात पंधरावीस टक्के वाढ सहज हाताळता यावी अशा ह्या जागा.


परंतू प्रत्यक्षात जर आंतरराष्ट्रीय बातम्या तपासल्या तर लक्षात येईल की अनेक स्मशानं, कबरस्तानं आता पुरेशी नाहीत ... बाहेर रांगा आहेत. शेकडो चिता मैदानांवर शेजारीशेजारी सामुहिक अंत्यविधीच्या रूपात जळतायत. Google वर overflowing crematoriums in India सर्च करून बातम्या वाचल्या तर चक्रावून जातो माणूस. निरनिराळया प्रांतांमधे नदीत शेकडो, हजारो शवं सोडून दिल्याच्या बातम्या फोटो-तपशीलांसकट छापलेल्या आढळतात. सगळेच एकाच वेळी खोटं बोलणार नाहीत कारण जागा, तारीख, संदर्भ, तपशील, बातमीचं कारण सगळे पैलू इतके वेगवेगळे अाहेत की त्यामधे संघटीत फसवणूक शक्य नाही हे स्पष्ट दिसतं.


ह्याचाच अर्थ मृत्यूदर अमाप वाढलाय पण तो कोविड ह्या सदरात नोंदवला जात नाहीये इतकंच. कोविडचं निदान होण्याआधीच मृत्यूचं प्रमाण गणती शक्य नाही इतकं वाढलेलं आहे असा निष्कर्ष काढण्यावाचून पर्याय नाही. अशा अचानक बेलगाम वाढीचं इतर काहीही कारण संभवतही नाही.  ह्याचाच अर्थ बेसुमार वाढ झालेला कोविड आता तपशीलाबाहेर गेलेला आहे. 


... मात्र हे लोकांना वाचायला, ऐकायला नको अाहे. न आवडणं स्वाभाविकच आहे. परिस्थिती दारुण व शोचनीय आहे, पण ती नाकारणं हा त्यावर उपाय नाही. तरीही ती नकळतच नाकारली जाते. सातत्याने नाकारली जाते.


खरंतर आशावाद म्हणजे सत्याकडे कानाडोळा करणं किंवा सत्य लपवणं नव्हे. किंबहुना आशावादावर सखोल संशोधन करणारे मार्टिन सेलिग्मन हा धोका नेमका दाखवून आशावाद्यांनी ही चूक टाळायला हवी ह्यावर भर देतात. प्रत्यक्षात मात्र आशावाद आणि सकारत्मकतेच्या नावावर बेदरकारपणा आणि बेफिकिरी नांदताना दिसत आहेत.


आताशा ह्या भाबड्या आशावादाचा, उत्क्रांत तर सोडाच, आदिम भावनांशीही फारकत घेणारा विद्रुप अवतार पाहिला की अतीव निराशा जन्माला येते. माणूस उत्क्रांत आहे, सतत क्रमाक्रमाने अधिकाधिक उत्क्रांत होतोय ह्यावरचा विश्वास अद्याप ढळलेला नसला तरी ह्या प्रगतीचा वेग मात्र आता निराशाजनक वाटतो.


तर्क, कल्पना आणि भावना ह्या त्रिकुटाचा स्वतःच्याही नकळत खुबीनं वापर करून माणूस अक्षरशः कुठल्याही विषयाचा स्वतःला हवा तसा अर्थ लावू शकतो. इतकंच नव्हे तर प्रसंगी अत्यंत ध्येयनिष्ठ माणूस स्वतःचे प्राण पणाला लावावेत किंवा इतर कुणाचा, अगदी निर्दोष, निष्पाप लोकांचाही जीव घ्यावा ह्या थराला जाऊ शकतो हे उघड आहेच. अत्यंत काटेकोर तर्कानुमान वापरू शकणारे कुटील लोक चाणाक्षपणे अशा ध्येयनिष्ठ लोकांचा वापर करतात हेही पुरेसं स्पष्ट आहे. परंतू पुन्हापुन्हा असे लोक बहुसंख्य वर्गांमध्ये, देशांमध्ये, सामाजिक स्तरांमध्ये, प्रदेशांमध्ये सद्वर्तनी, सुजाण, सच्च्या लोकांपेक्षा कितीतरी अधिक शक्तीशाली होत जातात हे चिंताजनक आहे.


"अति सर्वत्र वर्जयेत्" असं एक सुवचन आहे. इंग्रजीत ह्या सुवचनाच्या सर्वात जवळ जाणारं सुवचन कदाचित् everything in moderation हे असावं. तर्क, कल्पना आणि भावना ह्यांचा सुयोग्य परिपाक जिथे साधला जातो तिथेच विवेक जन्माला येतो असा विश्वास मला वाटतो. ह्यातील कोणताही एक पैलू अव्याजवीपणे सूज यावी तसा वाढत गेला तर सुडौल विवेकाची जागा बेडौल अतिरेक घेऊ लागतो.


भावनिकतेतून रुजणारी शेकडो ... कदाचित् हजारो ...  परस्परविरोधी मानवी मूल्ये हाताळताना हा विवेकच व्यक्तीसापेक्ष बदलत जावा हे मात्र दुर्दैव आहे. ह्याची उदाहरणं दैनंदिन आयुष्यातही विखुरलेली दिसतात. ती केवळ राजकारणात अथवा समाजकारणातच दिसतात असं नाही.


देश ही मानवाला वसवण्यासाठी जन्मलेली संकल्पना खरं तर. गेल्या उण्यापुर्‍या दिडदोनशे वर्षांत अधिकाधिक नावारूपाला येऊन महायुद्धांमुळे अधिकाधिक काटेकोर होत गेलेली. मूल्यं परस्परविरोधी असतात व चर्चा किंवा निव्वळ शाब्दिक देवाणघेवाणीतून वैचारिक - भावनिक बैठक बदलू शकत नाही त्यामुळे चर्चा व्यर्थ आहे हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. काही जण देश लोकांसाठी मानतात तर काही लोक देशासाठी. पण मूल्यांचा अतिरेक इतका व्हावा की लोकांच्या जीवाचंही महत्व वाटू नये हे चिंताजनक आहे.


हे पाहिलं की "आधी सुराज्य नंतर स्वराज्य" हाच विचार योग्य होता अशी जाणीव प्रबळ होऊ लागते. इतकंच नव्हे तर कितीही कंटाळवाणा, सुमार व अनाकर्षक विचार भासला तरी आज पेरलेलं बीज आपण पाहू शकणार नाही अशा वृक्षाला जन्म देईल व त्याची फळं येणाऱ्या पिढ्यांना मिळतील हाच आशावाद केवळ आपण सर्व योग्य ते विवेकानं केल्यानंतर उराशी बाळगावा हा विश्वास मनात शिल्लक राहतो. 


पर्यायच काही उरला जेव्हा नसे

मी सहज नि सोपे ... काय करावे .... कसे ... ?

... हा प्रश्न पडे अन् कठीण उत्तर स्फुरे

“करण्याजोगे सोपे ना काही उरे!"


शतकाशतकांची घट्ट सनातन घडी

साकळली जिच्यात मूढ मती भाबडी

कणखर बुद्धीला करून टाके लुळी

मेंदूत भरे वर स्वप्नांची पोकळी!


जो युगायुगांचा गाळ इथे साचला

पाहिजे तसा तो सावकाश काढला

कोणात कधी मी देवदूत पाहणे

हे पुन्हा पुन्हा गाळात रुतत राहणे!


- निलेश पंडित 

२३ मे २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा