हा ब्लॉग शोधा

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

पाऊल


आशेस स्वप्नाचे  |  फुटताच पंख

अंतर्बाह्य डंख  |  अंधत्वाचा


ह्रदयात वसे  |  नि:शब्द ओलावा

स्वार्थाचा गिलावा  |  त्यास दृढ


खोलवर दडे  |  पशूत्वाचा पाश

तर्क सावकाश  |  मागाहून


आधी होई दाह  |  त्यातून भडका

भावनेचा डंका  |  रोमरोमी


हिरीरीने सज्ज  |  उसळते रक्त

भावूकता नक्त  |  वरचढ


मढवून तीस  |  शब्दांनी विविध

विरोधाचा वध  |  होत जाई


विवेकास मिळे |  नित्य मूठमाती

सोयिस्कर नीती  |  येता जाता


चातुर्य शांतता |  बाह्यावरणात

मुरे अंतरात  |  पशूवृत्ती


स्वतःच स्वत:स  |  पाहण्याचा ध्यास

आणिक प्रयास  |  दंभ फक्त


अगणित स्वप्ने  |  जन्मती विरती

जुन्यांची उत्पत्ती  |  नवी भासे


केवळ कल्पना  |  नित्य उगाळीत

संस्कृती म्हणत  |  युगे जाती


काल्पनिक दशा  |  कधी पारतंत्र्य

आणिक स्वातंत्र्य  |  व्यर्थ चित्रे


शक्तीशाली नित्य  |  अल्प संभावित  

असंख्य शोषित  |  हाच साचा


प्रदीर्घ पशूता  |  अल्प आयुर्मान

मानवाचे मन  |  बळीसम


नवनवे जीव  |  स्वप्ने नवनवी

मानस मानवी  |  मात्र तेच


गर्त जुनी तीच  |  वेगळे चेहरे

खेळाडू मोहरे  |  नवनवे


सारा खेळ असा | पाहती दुरून

खोल अभ्यासून | तुरळक


एक भयंकर | त्यांच्यात प्रकार

कुटिल व क्रूर | गिधाडांचा


दुसरा प्रकार | मात्र आश्वासक

सुजाण सोशिक | माणसांचा


त्यांच्या प्रयत्नात | पडावे पाऊल

दडावी चाहूल | भविष्याची



- निलेश पंडित

२२ आॅगस्ट २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा