हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

धनरेषा


(वृत्त: समुदितमदना)

तीन चार छोटेसे वाडे दोन तीनशे घरे
माळरान, डोंगर, शेतांशी खळखळणारे झरे
…. कुणी राबणे शेतांवरती गावामध्ये कुणी
बघता बघता अवघे जगणे सहजगतीने सरे

फारच थोड्या नव्या अपेक्षा मर्यादित मागणे
अन्न, वस्त्र अन् निवारा टिको हेच स्वप्न पाहणे
…. भवितव्याची नसे काळजी नसे जगाची क्षिती
लेश कुठे ना अभिमानाचा नसे कुणी झुंजणे

स्वप्नहीनता गुन्हा ठरे हा प्रगतीचा कायदा
गावाखाली खनिजधनाची आढळली संपदा
…. धनरेषेने जीवनरेषा केली थोडी उणी
शांततेतल्या निद्रेवर आली स्वप्नांची गदा

शहरामध्ये दिसल्या त्यांच्या आज नव्या झोपड्या
गुन्हे, गरीबी, अन्नस्वप्न घेऊन उभ्या बापड्या



- निलेश पंडित
२३ जानेवारी २०१६

1 टिप्पणी: