हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

वंशज

पूर्वजांच्या थोरवीचे एक साधे माप होते
पुण्य संकल्पात बाकी फक्त सारे पाप होते

वारसा मी पूर्वजांचा घेतला ... आनंदलोही
मात्र त्यातच दुर्बलांचे घोर सारे शाप होते

सोवळे अन् ओवळेही पाळले मी मूढतेने
थोर मंगल संस्कृतीचे क्षुद्र काही व्याप होते

दुर्जनांना ठेचण्याचे गात गेलो श्लोक आम्ही
जीव आम्ही मारले ते नेमके अश्राप होते

कृत तसे त्रेता नि द्वापारात सारे ठीक झाले
स्पष्ट सोपे शाप होते त्यात वर उ:शाप होते

राजहंसांच्या पिढ्यांची वर्णने बखरीत होती
वंशजांमध्ये पुढे बगळेच वारेमाप होते

- निलेश पंडित
२ आॅगस्ट २०१६

२ टिप्पण्या: