हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

फाळ

खोलवर आत । रुतू द्यावा फाळ
ढेकूळ ढेकूळ । ढवळावे

कण कण माती । प्रकाशून जावी
पाण्याने भिजावी । अंतर्बाह्य

अशक्य भासता । दंश औजाराचा
जैविक खताचा । मारा घ्यावा

मुळात जे त्याज्य । मूत्र आणि शेण
तेही कुजवून । वापरावे

त्यातूनही काही । कीड आणि तण
जन्माला येऊन । बाधतात

समाधान खरे । लाभे अंती तेव्हा
पिके येती जेव्हा । टरारून

शेत बाह्यजग । चिंतन कवित्व
अवघे अस्तित्व । असलेच

सृष्टीच्या अंतरी । दडे ब्रह्मवाक्य
टळणे अशक्य । मशागत


- निलेश पंडित
१४ आॅक्टोबर २०१६

३ टिप्पण्या: