हा ब्लॉग शोधा

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

अटळ


रातकिड्यांची किरकिर वाढली आहे ... होती
भवताल अधिकाधिक काळवंडत आहे ... होता
अंधार ग्रासणार आहे ... होताच
दृष्टीचा विभ्रम मनोमन टिकूनही
दृष्टोलोप होणारच आहे ... होताच
त्यात पावसाची रिपरिप
पायाखाली संतत ओल वाढवणारी

विनाकारणच
अंतर्मन तरीही सांगत राहिलं
दैदिप्यमान सूर्य
कोणत्याही पहाटरंगांविना
अवतरेल अचानक

शक्तीशाली अधिकारी पूज्य सारे 
दाखवतही राहिले
नवनवीन काही
... आणि राहिले म्हणत
हीच नवी रूपं सूर्याची
प्रकाशाचीही
... दिव्यचक्षू प्राप्त होताच
उमगतील

त्यात नवनवीन संशोधनात गवसली
खात्रीदायक हमी
आदिम भावनांचा गाभाच
उत्क्रांत नाजुक भावना
धस लावून
ठिसूळ करत राहण्याची

अंधार अधिक गडद 
उत्तररात्रीचा की मध्यरात्रीचा
ह्यावर चर्चा रंगत गेली
अधिकाधिक उत्तरोत्तर 

दीर्घकालीन बदल
अनुभूतीनंतरही अतर्क्य अविश्वसनीय
स्वप्नरंजनात
क्षणार्धात सदैव साक्षात्काराचा
हव्यास

असह्य वर्तमान
अनाकलनीय भवितव्य म्हणून
हव्या त्या ... तितक्याच 
भूतकाळाकडे बघण्याचा
अगम्य अट्टाहास

... ह्या भरीव अमर्याद पोकळीनंतर
होता काही ... असतो काही?
पर्याय?
दुसरा पर्यायच नाही
असं म्हणून वाचाळ
तथाकथित सुजाणांना
धाकदपटशानं मुस्कटदाबीनं
सतत गप्प करत राहण्यावाचून?

दुर्लक्षित संततधार पावसानं
पायाशी इतकी दलदल झाली होती एव्हाना 
... की आता निरुपयोगी, निष्फळच काय 
अशक्यही होत्या
गारगोटी, ठिणग्या, शेकोट्या, समया, पणत्या, वाती

थोर संस्कृतींना 
मानवत नाहीत
असे संकुचित पर्याय!



- निलेश पंडित
२४ एप्रिल २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा