हा ब्लॉग शोधा

शनिवार, १ मे, २०२१

दग्धता

 

फक्त सोयिस्कर तिथे नेत्यास अपुल्या आठवा

चांगले होईल ते नावास त्याच्या चिकटवा

... रंगवा इतिहास इतका की जणू आदर्श तो

वेदनामय वर्तमानी स्वप्न पुढचे दाखवा


रूपकाचे आणि उपमेचे करावे खेळणे

आहुती निष्पाप जीवांची तिच्यास्तव टाकणे

... खूप मोठे देव-धर्मा आणि देशाला करा

सहज ठरते माणसांनी माणसांना मारणे


संकटे, संहार, लय नसती कधीही कायमी

चांगले काहीतरी घडते कुठेही नेहमी

... भोळसट कोणी खुळे पडता बळी सगळीकडे

सूज्ञ देती चिरसुखाची मूढ लोकांना हमी


भान ठेवा सूज्ञतेचे ह्या व सोसा दग्धता

भोवताली पाहताना पेटत्या लाखो चिता

...  होरपळ झाली तरी सोसेल ती पुढली पिढी

आपले द्या प्राण पण मखरात ठेवा देवता



- निलेश पंडित

२ मे २०२१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा