हा ब्लॉग शोधा

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

शंकित


 घडले जे ते तसेच घडले जसे हवे त्याला ते होते

तशीच काॅफी, मानमरातब, तसाच पैसा - रोजचेच ते!

... तशीच थोडी मनात दहशत, धाकधूक अन् नसत्या शंका

बंद पाकिटे, कोऱ्या नोटा, सुमार निर्णय, वरून खलिते


बरा म्हणावा असाच होता दिवस ... वाटले सायंकाळी

मादक पेये, नटवी लगबग, अतृप्ताच्या दग्ध पखाली

... रसरसलेले मुसमुसलेले क्लबात काही स्पर्श चोरटे

रंगरसांची अद्भुत दुनिया ... रोजप्रमाणे सजली सरली


तिथे गवसली कृत्रिम फसफस तरंग नाजुक जिथे असावा

पदरी पडल्या शंकित नजरा जिथे खोल विश्वास वसावा

... कधीच कळले नाही त्याला काय मनावर पडले विरजण

दिसली केवळ क्रूर गिधाडे जिथे शोधला हिरवा रावा


बऱ्याच दिसल्या आज सुरकुत्या आरशात पाहता चेहरा

नजर स्वताची शंकित होता नकळत झाला गोरामोरा



- निलेश पंडित

९ फेब्रुवारी २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा