हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

भयभीत

 

भरती ओहोटीचे आभास

सतत अव्याहत

सरत जाणारा काळ

येणारा एकेक क्षण

बाजूला सारत

जुने क्षण

मनोमन विसरत जाणारी तू

अचानक एका क्षणी विरलीस

तरी उरलीस

तुझ्या आवडत्या

तू चितारलेल्या

जास्वंदीच्या फुलात

तुझ्या आवडत्या

नादावलेल्या सनईच्या सुरात

आणि तुला खळखळून हसवणाऱ्या

आणि तुझ्या भ्रमिष्टावस्थेतल्या

तोडक्यामोडक्या भाषेत

दाद मिळवणाऱ्या

पु लंच्या सखाराम गटणेतही


ह्या सर्वांचा एक

उसवलेला जुनाट बटवा

कसाबसा 

माझ्या बोजड सामानात सांभाळत

मी क्षण दिवस मास मोजतोय

अंतर्मनात भयभीत होऊन

… मी तर उरण्याचीही 

शक्यता आधीच विरलीय!



- निलेश पंडित

९ डिसेंबर २०२३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा