हा ब्लॉग शोधा

सोमवार, १ जानेवारी, २०२४

आधार


वलय विरले आणि माफक दाटला अंधार भवती

उजळण्याची पूर्ववत् जग शक्यता सुतराम नव्हती

… नेहमी जाणून होते व्हायचे होतेच हे मी

परत ओहोटीत फिरणे संपता अंतास भरती


अल्पशा मोठ्या कधी तर कैक छोट्याशा अपेक्षा

फोल त्या ठरतील अन् घेतील जगण्याची परीक्षा

… लागली ग्रासू मनाला हीच चिंता जीवघेणी

हाय दैवाने दिली वाटे मला का घोर शिक्षा!


आजवरचे … वाटले … संपूर्ण जगणे फोल ठरले

भूतकाळाचा विसर पडला जणू ऐश्वर्य विरले

… फक्त त्यांचा एक केवळ शेवटी आधार उरला

प्रियसख्याचे शब्द जेव्हा नेमके ह्रदयात शिरले


केस दिसले दोन पिकलेले मला माझेच जेव्हा

तो म्हणाला, “डाय कर ना हे असे दिसतील तेव्हा!”



- निलेश पंडित

२ जानेवारी २०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा